राजाराम (खां)वार्ताहर.
अहेरी (गडचिरोली):
अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपीविरुद्ध कडक पाऊल उचलले आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या नवीन कलम ८४ (पूर्वीचे दप्रसं कलम ८२) नुसार, आरोपी शामला उर्फ निला जुरु पुडो (रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली) याला न्यायालयात हजर होण्यासाठी जाहीर उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३५३ (सरकारी कामात अडथळा), १४३, १४७, १४८, १४९ (बेकायदेशीर जमाव व दंगल), आणि १२० ब (गुन्हेगारी कट रचणे) सह भारतीय हत्यार कायद्याच्या विविध कलमान्वये दामरंचा उप पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. (अपराध क्र. ०१/२०१५).
या प्रकरणात पोलिसांमार्फत आरोपीला अटक करण्यासाठी वारंट काढण्यात आले होते. मात्र, आरोपी दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत असून, अटकेची कारवाई टाळण्यासाठी तो फरार झाला असल्याचे किंवा गुप्तपणे वावरत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे.
१६ जानेवारीपर्यंत हजर राहण्याचे फर्मान
न्यायाधीश श्री. शाहिद साजीदुज्जामॉ एम.एच. यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही उद्घोषणा जारी केली आहे. आरोपी शामला उर्फ निला जुरु पुडो याने दिनांक १६/०१/२०२६ रोजी सकाळी अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर राहून आपली बाजू मांडावी, असे आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर आरोपी दिलेल्या तारखेला हजर झाला नाही, तर कायद्यानुसार पुढील कडक कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येईल. सदर उद्घोषणा २२ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयाच्या शिक्यानिशी जारी करण्यात आली असून, याची अंमलबजावणी दामरंचा उप पोलीस स्टेशनमार्फत केली जात आहे.

