मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भामरागड:-
अनुसूचित क्षेत्रातील तेंदूपत्ता खरेदी-विक्री प्रक्रिया २०२६ साली पूर्णपणे ई-टेंडरिंग पद्धतीने, ग्रामपंचायत नियम व पेसा कायद्याच्या चौकटीत राबविण्यात यावी, अशी ठाम व स्पष्ट भूमिका *मा. इंदरशाह मडावी, माजी समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद गडचिरोली* यांनी मांडली आहे.
दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी श्री. श्रीकांत नैताम, पेसा समन्वयक, पंचायत समिती भामरागड यांच्याशी तेंदूपत्ता खरेदी-विक्री प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मडावी यांनी सांगितले की, संविधानाच्या ७३ व्या घटनादुरुस्ती व पंचायती (अनुसूचित क्षेत्रांवर विस्तार) अधिनियम १९९६ (PESA Act) नुसार लघुवनोपजांवर प्रथम हक्क हा ग्रामसभेचा असून, तेंदूपत्ता हा अत्यंत महत्त्वाचा लघुवनोपज आहे.
तेंदूपत्ता खरेदी-विक्री करताना ग्रामसभेची संमती, सहभाग व निर्णयप्रक्रियेत अग्रक्रम देणे अनिवार्य आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८, महाराष्ट्र लघुवनोपज (व्यापार व नियमन) अधिनियम आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या व्यापारात पारदर्शकता राखणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविल्यास खुली स्पर्धा निर्माण होऊन ग्रामसभेला व आदिवासी संकलकांना योग्य व स्पर्धात्मक दर मिळेल. पारंपरिक पद्धतीत होणाऱ्या अपारदर्शक व्यवहारांमुळे अनेकदा ग्रामसभा व आदिवासी कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मडावी यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मध्यस्थ, दलाल किंवा खाजगी हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींना तेंदूपत्ता व्यापार प्रक्रियेत कोणतीही संधी देता कामा नये. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार ऑनलाईन ई-टेंडरिंगद्वारेच खरेदीदारांची निवड झाली पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
या संदर्भात *मा. इंदरशाह मडावी व श्री. श्रीकांत नैताम* यांनी संयुक्तपणे संवर्ग विकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात २०२६ साठी तेंदूपत्ता खरेदी-विक्री प्रक्रिया *पूर्णपणे पारदर्शक, कायदेशीर, ग्रामसभा-केंद्रित व दलालमुक्त* ठेवावी आणि ई-टेंडरिंग सक्तीची करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणी मान्य झाल्यास तेंदूपत्ता संकलनावर अवलंबून असलेल्या हजारो आदिवासी कुटुंबांना थेट आर्थिक लाभ होणार असून, शासनाच्या *“ग्रामस्वराज्य” व “आदिवासी हक्क”* धोरणाला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

