दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्षा शाहीन ताई हकीम यांचा पुढाकार.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भगवंतराव प्राथमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, लगाम व अहेरी दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लगाम व परिसरातील महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांमध्ये आपुलकी, सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा तसेच भारतीय संस्कृतीतील पारंपरिक सण व परंपरांचे जतन व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्षा शाहीन ताई हकीम होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लुबना हकीम, भगवंतराव प्राथमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य दुधबळे सर तसेच मुख्याध्यापक टांगरू कौशि उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक जीवनातील योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. स्पर्धांमधील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
खेडेमेडीच्या आनंदी वातावरणात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दुधबळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दुर्गे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

