युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथील हिंगणा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने आपल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल केल्यानंतर टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हिंगणा परिसरातील डीएनडी हाइट्स येथील एका फ्लॅटमध्ये घडली असून विध्येश्वरी आपटे वय 23 वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होती.
मृतक विध्येश्वरी आपटे ही नागपूरमधील आकार नर्सिंग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. ती आपल्या काही मैत्रिणींसोबत डीएनडी हाइट्स बिल्डिंग येथील फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. घटनेच्या वेळी तिच्या मैत्रिणी पदवीदान समारंभासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या वेळी विध्येश्वरी ही फ्लॅटमध्ये एकटीच होती. याच दरम्यान तिने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल केला होता आणि कॉल सुरू असतानाच तिने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तिच्या प्रियकराचे लग्न झाले होते. त्यामुळे ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहेत.

