मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिकच्या शिवसैनिकांना केले आहे.
गुरुवारी दि.3 मातोश्रीवर त्यांनी नाशिकच्या पदाधिकार्यांशी संवाद साधला.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरे गटाला मशाल ही निशाणी मिळाली आहे. पक्षाची बांधणी करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील साधारण 25 पदाधिकार्यांची बैठक बोलवली आहे. नाशिकच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी त्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते बबन घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या शोभा मगर, योगेश बेलदार, यशवंत जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. नाशिकच्या शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांचा सत्कार करत मशाल ही निशाणी भेट दिली. या निशाणीतून सकारात्मक ऊर्जा घेवून विरोधकांना पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
डिसेंबरमध्ये नाशिक दौरा
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच राज्याचा दौरा करणार आहेत. डिसेंबरमध्ये नाशिक जिल्हा दौर्यावर येण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी तयारी करण्याचे आवाहन पदाधिकार्यांना केल्यामुळे या निवडणुकांची धामधुम आता सुरु होणार आहे.

