मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
इगतपुरी:- इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी वाहनचालकाला मारहाण करीत दारूनी भरलेला कंटेनर असा ६३ लाख, २९ हजार ८५६ रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहमंद अबुलजैस शेख वय 22 वर्ष रा. उत्तर प्रदेश हा औरंगाबाद येथून दारुनी भरलेला कंटेनर घेऊन प्रवासासाठी निघाला होता. कंटेनरमध्ये ४३,२९,८५६ रुपयांची २२०० मद्याची खोकी होती. मधल्या प्रवासात कंटेनरमध्ये संशयित बसले होते. त्यांनी वाहन नाशिक, सिन्नरमार्गे नेण्यास सांगितले व एका पेट्रोल पंपाजवळ वाहन थांबले असता संशयितांनी शेख याला दमदाटी करत मारहाण केली. शेख याला नाशिक तसेच हरसूल येथे नेऊन तेथे सोडून दिले. शेख यांच्या ताब्यातील कंटेनर आणि मद्याच्या खोक्यांसह चोरट्यांनी पोबारा केला आहे.
या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास घोटी पोलीस करीत आहे.

