महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी संगमनेर-लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात सापळा रचून अटक केली आहे. १७२ किलो गांजासह कार, दोन मोबाइल असा एकुण २३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर कारवाई संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पोलीस पथकाने केली आहे.
कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मदने यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पोलीस पथकाला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.त्यांनतर शनिवारी दि.५ रात्री सव्वा आठच्या सुमारास पोलीस कर्मचारी कारवाईसाठी कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावर थांबले. रात्री ११. ५० वाजताच्या सुमारास लोणीहून संगमनेरच्या दिशेने येत असलेल्या कारच्या एम.एच ५० एल ९९७० चालकाला थांबविण्याचा इशारा केल्यानंतर त्याने कार थांबविली. चालक व त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला पोलिसांनी नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे संदिप लक्ष्मण भोसले वय ३५, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा, बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे वय ३०, रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर अशी सांगितले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात १७ पाकिटे आढळून आली, ती सर्व पाकिटे उघडून पाहिली असता त्यात गांजा आढळून आला. भोसले आणि शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेत. त्यांच्याकडील कार पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
या प्रकरणी पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करीत आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस नाईक दातीर, पोलीस कॉस्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, पोलीस नाईक अनिल कडलग, श्याम हासे, बापूसाहेब हांडे, सायबर सेलचे फुरकान शेख, प्रमोद जाधव, बाबासाहेब खेडकर, पोलीस कॉस्टेबल अनिल उगले, पोलीस हेड कॉस्टेबल मनोज पाटील, अमित महाजन, पोलीस नाईक विजय पवार, कानिफनाथ जाधव, साईनाथ पवार आदींनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

