प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा, दि.9:- ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायतीतील सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असून दि.23 डिसेंबर पर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे.
18 नोव्हेंबर रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द होईल. दि.28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करण्यात येईल. दि.5 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येणार आहे. दि.7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी 3 वाजता नंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजता आवश्यकता असल्यास मतदान घेण्यात येईल. दि.20 डिसेंबर रोजी मतमोजनी व निकाल घोषित करण्यात येईल. 23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.
आर्वी तालुक्यातील 26, आष्टी 6, देवळी 12, हिंगणघाट 12, कारंजा 17, समुद्रपूर 7, सेलू 23 व वर्धा तालुक्यातील 10 अशा जिल्ह्यातील एकुण 113 ग्रामपंचायतीतील सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक यांनी कळविले आहे.

