विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- तारकपूर बसस्थानकामध्ये रात्री मुक्कामी असलेल्या संगमनेर आगाराच्या बसमधून 35 लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी दि.15 ला घडली आहे. याबाबत संगमनेर आगाराचे चालक कैलास तुकाराम जाधव रा.सुकेवाडी, ता.संगमनेर, जि.अहमदनगर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर आगारातून सोमवारी दि.14 ला चालक कैलास जाधव व वाहक मारूती वाघुले हे एम.एच.14 बी.टी.3522 बस घेऊन संगमनेर आगारातून 120 लिटर डिझेल भरून नाशिककडे निघाले होते. त्यानंतर नाशिकहून बस तारकपूर आगारात रात्री साडनऊ वाजण्याच्या सुमारास आली. मंगळवारी सकाळी 5.45 वाजता नाशिकला जायचे असल्याने चालक-वाहक यांनी बस तारकपूर आगारात उभी करून मुक्काम केला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी नाशिककडे निघताना बसची पाहणी केली असता डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसले. त्यानंतर बसमधील 3 हजार 500 रूपये किमतीचे 35 लिटर डिझेल चोरीला गेल्याची चालक-वाहक यांची खात्री झाल्याने त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

