शुभम ढवळे मालेगाव प्रतिनिधी
मालेगाव/वाशीम: वाशीम जिल्हातून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. एका कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या बिलातील पाच टक्के कमिशन स्वरूपात (टक्केवारी) म्हणून तक्रारदाराकडून 14 हजाराची लाच स्विकारताना खंडाळा शिंदे (ता.मालेगाव) येथील सरपंचपतीला 31 जुलै ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
या लाचेला सहमती दर्शविणाऱ्या सरपंच महिलेला देखील पोलिसांनी बेळ्या ठोकल्या आहे. सरपंच पती भास्कर चिन्कू खिल्लारे वय 55 वर्ष व सरपंच रंजना भास्कर खिल्लारे वय 50 वर्ष दोघेही रा. खंडाळा शिंदे अशी आरोपींची नावे आहेत.
एका कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानंतर त्याला देयक मिळणे आवश्यक होते. मात्र, काम केलेल्या देयकासाठी पाच टक्के कमिशन द्यावे लागेल, अशी मागणी सरपंच पती भास्कर खिल्लारेंकडून झाल्याने यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी 25 व 27 जुलै रोजी करण्यात आली. पडताळणी कारवाई दरम्यान, कामाच्या बिलातील पाच टक्के कमिशन म्हणून भास्कर खिल्लारे यांनी 14 हजार रुपये लाचेची मागणी केली व सरपंच रंजना खिल्लारे यांनी त्याला संहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार 31 जुलै रोजी सापळा रचला असता, भास्कर खिल्लारे यांनी खंडाळा येथील राहत्या घरी लाचेची रक्कम स्विकारली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरूण सावंत व देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुजित कांबळे व चमूने पार पाडली.