विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- नगर-पुणे महामार्गावर एसटी बस आणि कंटेरनचा भीषण अपघात झाला.
कंटेनर आणि एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. महत्त्वाचं म्हणजे नगर पुणे महामार्गावर असलेल्या कामरगाव घाटामध्ये हा अपघात घडला. या अपघातात कंटेनर थेट रस्त्यावर उलटला. तर एसटी बस दरीत कोसळण्याची भीती होती. पण इतक्यात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात अडकली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. या एसटी बसमध्ये असलेल्या 14 ते 15 प्रवाशांना किरकोळ मार लागलाआहे.
कसा घडला अपघात?
अहमदनगर येथून पुण्याकडे कंटेनर निघाला होता. या कंटेनरच्या चालकाला कामरगाव घाटातील उतारावर वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. या कंटेनरच्या पाठीमागून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील आगारातील एसटी बस जात होती. कंटेनर रस्त्यावर उलटल्याने एसटी बसचा चालकही गडबडला. त्याने बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण बसवर ताबा मिळेपर्यंत कंटेनर आणि एसटी बस यांच्यात धडक झाली.
या धडकेनंतर बस दरीत कोसळण्याची भीती होती. मात्र सुदैवानं ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्याकडे गेली. त्यामुळे या बसमधील प्रवाशांचा जीव अगदी थोडक्यात वाचला. या भीषण अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.
एसटी बस आणि कंटेनर बसच्या या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. तर एसटी बसमधील 14 ते 15 प्रवाशांना किरकोळ मार लागलाय.या अपघातामुळे कामरगाव घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य केलं.

