देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर.ता.३०:– जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी १५ ते २० मित्र मोहगाव (झिल्पी) तलाव येथे गेले. पार्टी नंतर तलावात पाय धुण्यासाठी गेलेल्या एका मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस पथक स्थळी दाखल झाले. आज (ता.३०) सकाळी अग्निशामक दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतक आशीष दिगांबर मराठे वय २७ वर्ष हा मूळ निवासी भंडारा जिल्ह्यातील असून सध्या खापरी पुनर्वसन कॉलनी येथे वास्तव्याला आहे. तो ॲमेझॉन कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ॲमेझॉन कंपनीतील सुरक्षा गार्ड म्हणून काम करणारे १५ ते २० मित्र प्रदीप बावनकर यांच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मोहोगाव( झिल्पी) तलाव येथे गेले. वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर आशिष मराठे हा पाय धुण्यासाठी तलावात गेला. खोलवर पाण्यात गेल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मदतीसाठी अतुल खडसे व दोन मित्रही धावले. मात्र आशिष हा पाण्यात खोलवर गेल्याने घाबरून मदतीसाठी गेलेले हे मित्र तलावा बाहेर आले. बराच वेळ मित्रांनी तलावावर त्याचा शोध घेतला. मात्र तलावात बुडालेला आशिष बाहेर आला नाही. घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना मिळतात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ यांनी अग्निशामक दलाच्या पथकाला प्रसारण केले. या पथकातील कर्मचारी दिनकर गायधने व शरद दांडेकर यांनी तलावात शोध मोहीम राबवली मात्र रात्री अंधार पडल्याने ही शोध मोहीम थांबविण्यात आली.
परत ३० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता पुन्हा अग्निशामक दलाने शोध मोहीम सुरू केली असता सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आशिष चा मृतदेह पथकाच्या हाती लागला. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव उत्तरिय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तेलरांधे करीत आहेत.