✒️संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आपण आज पर्यंत रुग्णालयात विविध कारणांसाठी डॉक्टर्सवर हल्ले झल्याचे बघितले पण नागपुर येथे मात्र, चक्क एका डॉक्टरनेच दुसऱ्या डॉक्टर्स व रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांना शिवीगाळ करत दवाखान्यात गोंधळ घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
नागपुर येथील एका महिला डॉक्टरने अगदी शुल्लक कारणावरून रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत चक्क ‘एमआयसीयू’च्या दरवाजा तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात गोंधळ घालून तोडफोड करणाऱ्या महिला डॉक्टरवर मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दोन आठवड्यांअगोदर नागपूर शहरातील मानकापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. या रविवारी महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. मानकापूर येथील ॲलेक्सिस इस्पितळात हा प्रकार झाला. डॉ. रुक्मिणी फाबियानी असे संबंधित महिला डॉक्टरचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता डॉ. रुक्मिणी फाबियानी या त्यांच्या वडिलांना घेऊन दवाखान्यात आल्या. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना ‘एमआयसीयू’मध्ये भरती केले होते. दवाखान्यातील डॉ. नेहा गेडाम यांनी सायंकाळी महिला डॉक्टरला वडिलांच्या प्रकृतीचे ‘अपडेट्स’ दिले. मात्र महिला डॉक्टरने पतीला हे ‘अपडेट्स’ द्यावे असा आग्रह धरला. इतरही गंभीर रुग्ण असल्याने तुमच्या पतीशी बोलणे शक्य होणार नाही. तुम्ही स्वत: डॉक्टर असून तुम्ही तुमच्या पतीला समजावून सांगा असे ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरने सांगितले. यावरून महिला डॉक्टर चिडली व आरडाओरड सुरू केली.
दवाखान्यात १०० लोक आणून गोंधळ घालण्याची तसेच डॉक्टरांना मारहाण करण्याची धमकी दिली. याशिवाय तेथील अटेंडंट, परिचारिका यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की देखील यावेळी त्यांनी केली. यानंतर ‘एमआयसीयू’च्या दरवाज्याला लाथा मारत त्याचे लॉक व कॉलबेलदेखील तोडली. यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी याची माहिती रूग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
तेथील उपसंचालक डॉ. नीलेश अग्रवाल यांनी सीसीटीव्ही तपासून खातरजमा केली. त्यानंतर मानकापूर पोलिस स्टेशन मध्ये डॉ. रुक्मिणी फाबियानी यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनीदेखील फुटेजची शहानिशा केली व त्यानंतर महिला डॉक्टर रुक्मिणी फाबियानी विरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियमाच्या कलम चार सह भा.दं.वि.च्या कलम 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका डॉक्टरनेच असा प्रकार केल्याने पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.