नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने सर्व बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी आराखडा तयार करा आणि त्यामाध्यमातून दर्जेदार सोयी-सुविधांची निर्मिती करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री – एकनाथ संभाजी शिंदे यांनी पणन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पणन महासंघाच्या माध्यमातून शेतमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्या तसेच शेतीपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याला प्राधान्य द्यावे असे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करावा, त्याशिवाय बाजार समित्यांमध्ये पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांचेसह राज्य वखार महामंडळ, पणन महासंघ, कृषी राज्य पणन मंडळ, ग्राहक महासंघ, कापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

