✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एबीपी नेटवर्कच्या वतीने मुंबईतील ग्रँड हयात हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ आयडियाज ऑफ इंडिया समिट २०२३ ‘पर्व दुसरे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन इकॉनॉमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यामध्ये महाराष्ट्र १ ट्रिलीयन इकॉनॉमी देऊन देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा क्रमांक अग्रेसर ठेवेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
त्यासोबतच गेल्या ८ महिन्यात आमच्या शासनाने अनेक महत्वपूर्ण आणि विकासाला चालना देणारे निर्णय घेतले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग, मुंबई मेट्रो, मुंबईतील सागरी महामार्ग, आपला दवाखाना, मुंबईतल्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट भूमिपूजन, यासह ५ हजार कि.मी. चे एक्सप्रेस कंट्रोल हायवे विकसित करण्याचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत.
याशिवाय रस्ते, रेल्वे आणि समुद्री मार्ग बनवून केवळ देशालाच नाही तर जगाला अनुकरणीय असे परिवहन योजना आणण्यात महाराष्ट्र पुढे राहील. समृद्धी महामार्ग, मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड आणि एमटीएचएल मार्ग हे महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा बनतील असा विश्वासही यासमयी बोलताना व्यक्त केला.
राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे चांगले सहकार्य मिळत असून केंद्र सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी मिळाला आहे. दावोस येथे झालेल्या परिषदेत विविध उद्योग समुहांशी १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून दीड लाख रोजगार निर्मिती होत आहे. याशिवाय मित्रा समितीची स्थापना, आर्थिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात अधिक गुंतवणूक वाढ होईल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला मिळाले असले तरीही कुणाच्या प्रॉपर्टीवर दावा सांगण्याची इच्छा नसून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच आमच्यासाठी पुरेसे असून तेच पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करणार असल्याचे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
यासमयी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, एबीपी नेटवर्कचे संपादक राजीव खांडेकर, एबीपी नेटवर्कच्या निवेदका रुबिका लियाकत तसेच एबीपी नेटवर्क मधील सर्व पत्रकार आणि संपादकीय विभागातील सहकारी उपस्थित होते.

