विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना केवळ पाठांतर न करता आशयाचे आकलन करून घेणे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संतोष मैड यांनी केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव येथील एस.एस.सी. परीक्षा मार्च 2023 च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना मला स्वतःला शालेय शिक्षण घेत असताना दहावी- बारावी मध्ये अत्यंत कमी गुण मिळाले होते. खऱ्या अर्थाने अभ्यास कसा करायचा याचे मार्गदर्शन मला वैद्यकीय शिक्षण घेत असताना माझ्या एका मित्राने सांगितले. ग्रामीण भागातील मुले ही अत्यंत हुशार व कर्तबगार असतात परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने ते आपल्या उद्दिष्टापासून दूर जातात आणि म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते गाठण्यासाठी विविध मार्ग शोधले पाहिजेत. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे. असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. तसेच विद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या शालेय सुविधा खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक स्वरूपाची मदत करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत शिंदे यांनी करून देऊन शालेय कामकाज योग्य पद्धतीने कसे चालते हे स्पष्ट केले. अभ्यास पूर्ण झालेला आहे, विद्यार्थ्यांनी मुक्त वातावरणामध्ये पेपर लिहावेत, चांगल्या प्रकारे अभ्यास करावा असे सांगून भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रमुख वक्ते देविदास झाल्टे सर यांनी आपल्या मनोगतातून टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही याचे मार्मिक उदाहरण देऊन परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी काय करावे? काय करू नये. आहार कसा घ्यावा? अभ्यास कसा? करावा पेपर कसा लिहावा? याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदूभाऊ जेजुरकर हे होते. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असणारे ऋण व्यक्त करण्यासाठी उत्तम दर्जाचे आहुजा कंपनीचे दोन स्पीकर बॉक्स याप्रसंगी विद्यालयास सप्रेम भेट दिले. त्याचा स्वीकार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य रंगनाथ चोळके, बशीरभाई शेख, दादासाहेब गवांदे, पर्यवेक्षक प्रमोद तोरणे, सखाराम शिंदे , निर्मला लावरे, छाया जेजुरकर, कविता घोडसरे व इतर सेवक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जालिंदर गायकवाड, प्रतीक्षा थोरात, ज्ञानेश्वर राजळे, सचिन चौधरी, संतोष सोनवणे, ग्रंथपाल रंजय कडू लेखनिक सुनील बोठे, संगणक शिक्षक अनिल घोडेकर, राजाराम थोरात, सुमन कणसे आदींनी मोलाचे सहकार्य केले. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संतोष कदम यांनी उत्तम प्रकारे केले तर आभार उपशिक्षिका वृषाली बेल्हेकर यांनी मांडले.