मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्द, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि आधुनिक अखंड भारताचे प्रणेते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव, सिंपन प्रतिष्ठानच्या विद्यमाने अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली, रविवार दि. १४ मे २०२३ रोजी, सकाळी १०:३० वाजता, प्रहार भवन सभागृह, शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी, कणकवली येथे मनिषाताई आनंदराज आंबेडकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे. यावेळी प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जीवन गौरव पुरस्कार तर, प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विजयी भव युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
१४ मे १९३८ रोजी बाबासाहेबांची जानवली येथे कणकवली परिषद संपन्न झाली होती. त्यावेळी त्यांच्या पदस्पर्शाने आणि अमृतवाणींने सर्वांना नवसंजीवनी मिळाली होती. त्या ऐतिहासिक दिनाच्या अनमोल स्मृती जतन करण्यासाठी सिंपन प्रतिष्ठानच्या विद्यमाने प्रतीवर्षी १४ मे हा ‘परिवर्तन दिन’ म्हणून साजरा करुन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच दिनाच औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल विचारांना, त्यांच्या दैदिप्यमान कार्याला तसेच सामाजिक क्रांतीदूतांना अभिवादन करुन नव्या पिढीला प्रोत्साहित करुन चळवळ गतीमान, प्रेरणादायी करण्यासाठी प्रा. रमाकांत यादव आणि प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून, पहिल्या जीवन गौरव पुरस्काराचे सन्मानार्थी शिक्षण महर्षी प्रिन्सिपॉल आर. एल तांबे तर, विजयी भव युवा पुरस्काराचे सन्मानार्थी प्रसिद्ध नाट्य निर्माते राहूल भंडारे आहेत. तरी समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुजन समाजातील सर्व मान्यवर मंडळींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांनी केले आहे.

