संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील वाडी परिसरातून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादवनारी घटना 15 वर्षा अगोदर घडली होती. एका चार वर्षीय चिमुकल्या बालिकेवर प्राशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या नराधम आरोपी वसंत संपत दुपारे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती. त्याच्या विरोधात आरोपीने दया याचिका केली होती. ती दया याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे, मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुबनंतर नागपुरात फाशीवर चढणारा दुपारे हा क्रुरकर्मा ठरणार आहे.
चार वर्षीय चिमुकली वर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 3 मे 2017 रोजी नराधम आरोपी वसंतची पुनर्विचार याचिका फेटाळत फाशी कायम ठेवली होती. त्यामुळे, 28 मार्च 2023 रोजी त्याने राष्ट्रपतींकडे दयेसाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका पण फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे नराधम दुपारेच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे घटना…
नागपुर येथील वाडी परिसरात 3 एप्रिल 2008 एक संतापजनक घटना घडली होती. पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या इसमाकडे नराधम वसंत नेहमी यायचा. घटनेच्या दिवशी वसंतने चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेले. तिच्या घरासमोरून घेतल्यानंतर दुपारेने खडगाव येथील मातानगर परिसरात नेले. पोलिसांना त्याच रात्री आरोपी वसंत हा गड्डीगोदाम परिसरामध्ये फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सूत्र हलवत त्याला अटक केली आणि चौकशी केली. त्यांनतर त्याने त्याच रात्री खडगाव येथील घटनास्थळ दाखवले. या चौकशीत चिमुकलीवर बलात्कार करीत तिचा दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले होते. एवढेच नव्हे तर तिला नराधमाने पुरले होते.
समाजमनाला हादरा देणाऱ्या या कृत्याबद्दल नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने 23 फेब्रुवारी 2012 रोजी वसंत दुपारेला फाशीची शिक्षा ठोठावली होती. तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही दुपारेला कोणतीही दया न दाखवता 26 नोव्हेंबर 2014 रोजी निर्णय देत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
त्या शिक्षेला दुपारे याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने 2014 मध्ये वसंत दुपारेची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. दरम्यान, दुपारे याने फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या पूर्णपीठासमोर सुनावणी झाली.
मात्र, अशा विकृत घटनांना आवर घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून फाशीची शिक्षाच योग्य ठरेल, असे नमूद करीत दुपारेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने 2017 साली फेटाळली होती.
नराधम दुपारे नागपूर मध्यवर्ती कारागृहात
वसंत दुपारे विरोधात वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात दुपारे बंदिस्त आहे. तर, सत्र न्यायालयाने २०१२ साली फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी कारागृहातील फाशी यार्डात करण्यात आली. राष्ट्रपती सचिवालयाकडून दुपारेच्या फाशीवरील अंमलबजावणीचे आदेश आल्यानंतर त्याला फाशी देण्यात येईल.

