सौ हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील किन्ही गावाजवळ लग्नाचं वरात घेऊन जाणारी एक खाजगी बस नाल्यात पडून भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका महिला प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर 24 नागरिक जखमी झाले आहेत.
विवाह सोहळा आटोपून शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास एक खाजगी बस प्रवाशांना घेऊन राजुरा येथून नांदगावकडे प्रवासाला निघाली होती. रात्रीच्या सुमारास किन्ही गावाजवळील वळणावर बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस पुलावरून नाल्यात कोसळली आणि हा भीषण अपघात झाला.

बस कोसळ्याचा जोरदार आवाज….
बस कोसळ्याचा जोरदार आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. काय झालं हे समजण्यासाठी गावातील नागरिकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. आणि बचाव कार्य सुरू केलं. या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली बल्लारपूर पोलिसांना माहिती मिळतात तडकाफडकी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले. अपघातावेळी बसमध्ये विवाह सोहळा आपटून निघालेले तब्बल 60 वऱ्हाडी होते. या दुर्घटनेत सुनंदा हरिदास मडावी वय 50 वर्ष यांचा मृत्यू झाला, तर इतर 24 नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
बस खाली दबले अनेक प्रवासी..
विवाह कार्यात किरायाने घेतलेल्या बस दुर्घटनाग्रस्त झाली या बसखाली अनेक प्रवासी दबले होते. या बसला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. वेळेवर मदत पोहोचल्याने अनेकांचे जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघाताप्रकरणी पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.

