ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- येथून एक काळीज हेलावणारी बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या पोटच्या पाच महिन्यांच्या चिमुकल्यासह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी पाचोरा तालुक्यातील लासगाव गावातील शेत शिवारामध्ये घडली आहे. लजिनाबी आरिफ शेख रा. लासगाव ता. पाचोरा असे मृत महिलेचे नाव आहे तर असद आरिफ शेख असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना उघडकीस येताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लजिनाबी आरिफ शेख या महिलेने आपल्या पोटच्या चिमुकल्या मुलाला घेऊन शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
नेमकी काय आहे घटना? पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांची मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव असद ठेवण्यात आले. असद व पत्नी तसेच परिवारासह आरिफ शेख हे लासगाव येथे राहत होते. 28 मे 2023 रोजी गावात समाज बांधवातील लग्न असल्याने आरिफ शेख यांच्या परिवारास आमंत्रित करण्यात आले होते. ठरल्यानुसार आरिफ शेख हे पत्नी लजीनाबी व मुलगा असद यांना सोबत लग्नाना गेले. याठिकाणी लग्नसोहळ्याचा कार्यक्रम सुरु असताना लजीनाबी यांनी पती आरिफ यांना मी थोड्यावेळात परत येते सांगून त्या तेथून निघून गेल्या त्या परत आल्याच नाही. त्यांनी सोबत आपला मुलगा असदला देखील सोबत घेऊन गेल्या होत्या.
बराच उशीर होवूनही लजिनाबी ह्या लग्नात पोहचल्या नाही. यानंतर सगळीकडे त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. शेवटी आरिफ शेख यांनी पत्नी व मुलगा बेपत्ता झाल्याबाबत पाचोरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यांनतर आज या दोघांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

