आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळात नागरिक दिसेनासे झाल्याचे चित्र दिसून आले. अखेर प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याना बोलावून कार्यक्रमात गर्दी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यात महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होणार होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आला होता. एक हजार नागरिक बसणार अशी आसन व्यवस्था करण्यात आली होती. पण साडेतीन वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली त्यामुळे शहरातील नागरिकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आयोजकांवर प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलविण्याची वेळ आली.
यानंतर या उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 5 वाजताच्या सुमारास कार्यक्रम स्थळी आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीमधून उतरताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमाबाबत माहिती सांगत होते. त्यावेळी ऑनलाइन कार्यक्रम घेतला असता तर बरं झालं असतं, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडले.

