✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– समाज कल्याण विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त शरद चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी खा.रामदास तडस यांनी शाहू महाराज यांच्या जिवनातील महत्वपूर्ण व उत्कृष्ठ कामाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना करुन दिली तसेच शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. छत्रपती शाहू महाराज रयतेचे राजा होते. त्यांनी शिक्षणाचा प्रसार करून जनतेला शिक्षित केले. समान न्याय देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या. हेच ध्येय ठेऊन शासन सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहे. या शासकीय योजना शेवटच्या नागरिकां पर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिक योजनांची माहिती प्रसाद कुळकर्णी यांनी दिली व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शरद चव्हाण यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. दि.16 ते 26 जून या कालावधीत व्यसनमुक्ती पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार आज व्यसनमुक्तीची शपथ उपस्थितांना देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते परिवर्तन या पुस्तकाचे व घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश, जात वैधता प्रमाणपत्र आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जमीन वाटपाबाबतचे सातबारा तसेच अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना बचत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे ई-लायब्ररीचे उद्घाटन सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून खा.रामदास तडस यांच्याहस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे ई-लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक न्याय विभाग नागपूर अंतर्गत सहाय्यक आयुक्त अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील मुलांचे शासकीय वसतीगृह उमरी मेघे, देवळी, पुलगाव येथे यापुर्वीच ई-लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. या ई-लायब्ररीमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे फार्म भरणे, JEE, NEET, MHCET इत्यादी परिक्षांची पुर्वतयारी करणे, अभ्यास विषयक अवांतर माहिती गोळा करणे, ऑनलाईन क्लासेससाठी मदत होणार आहे. ई-लायब्ररीमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक दृष्टीकोणातून त्यांचा विकास होण व त्यांचा अभ्यास होण्यासाठी महत्वाचे आहे, असे रामदास तडस यांनी सांगितले.

