प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नगरपालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या जीबीएमएम मोहता शाळेचा प्रशासनाचे पुन्हा एकदा दुर्लक्षित कारभार समोर आलेला आहे. मागील एका विद्यार्थ्यांचे डुबलीकेट टी. सी. चे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा मोहता शाळेचे प्रशासन विद्यार्थ्यांच्या संदर्भात किती असंवेदनशील आहे हे या प्रकरणातून पहावयास मिळते.
हिंगणघाट शहरातील मोहता कनिष्ठ महाविद्यालय हे केवळ नागपूर विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळालेले कनिष्ठ महाविद्यालय असून या कनिष्ठ महाविद्यालयाने राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा मेरिट तसेच विभागीय आणि जिल्हास्तरावर मेरीट दिलेले आहेत. हिंगणघाट शहरामध्ये शासनाने बांधून दिलेली भव्य इमारत असून कनिष्ठ महाविद्यालया मध्ये प्रवेशाकरिता रांगा लागत असतात. तसेच हिंगणघाट शहरामध्ये वर्ग पाच ते बारावीपर्यंत एकमेव सरकारी शाळा असल्याने गरजू व होतकरू पाल्यांचा पाल्यांना सोयीस्कर म्हणून ही एकमेव शाळा आहे. परंतु या शाळेच्या प्रशासनाचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अति उष्णतेमुळे २७ जून पासून सुरू होणारे सत्र ३० जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ३० जून पासून शाळा सुरू झाल्यात. मोहता शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागाचे अकरावीचे पाच व बारावीचे पाच असे एकूण दहा वर्ग आहेत. बारावी वर्गाचे सत्र सुरू झालेले असून अकराव्या वर्गाचे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि मोहता शाळेमधील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनुदानित तुकड्यांवर कायमस्वरूपी केवळ ७ शिक्षक आहेत.
यामुळे अनुदानित व विनाअनुदानित तुकड्या वरील रिक्त पदांकरिता मोहता शाळेचे प्रशासन दरवर्षी जाहिरात देऊन तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक करत असते परंतु आज घडीला शाळा सुरू होऊन अजूनही कुठल्या शिक्षकांची नियुक्ती केली गेली नाही. त्यामुळे ज्या विनाअनुदानित तुकड्यांवर विद्यार्थ्यांच्या पालकांनी पैसे भरून प्रवेश मिळवलेला आहे आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण पायरी आहे जी मुलांची भविष्य निर्माण करीत असते. परंतु विद्यार्थ्यांना शिकवण्याकरिता शिक्षकच नियुक्त न केल्यामुळे बाराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आणि या प्रकरणाकडे शाळेच्या प्रशासनाचे तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन प्रमुखाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पालक वर्ग अतिशय चिंताग्रस्त झालेला आहे. प्रस्तुत माहितीची दखल शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे नाहीतर संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळालेली शाळा मोडकळीस येण्यास वेळ लागणार नाही.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348. 7385445348

