आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- रेशन दुकानात वापरण्यात येणारा शासकीय तांदूळ विना परवाना गोदामातून वाहतूक करीत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई वर्ध्यातील कोल्ही शिवारात समुद्रपूर पोलिसांनी केली. श्रीकांत प्रभाकर शिंगरु वय २६ वर्ष रा. हिंगणघाट, अंकित धर्मेंद्र कराडे वय २६ वर्ष रा. वाकधरा ता. वणी जि. यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गंभीर प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्ही शिवारातील गोदामातून शासकीय तांदळाचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ कोल्ही शिवार गाठून वामण भाईमारे यांच्या शेतातील गोदामात छापा मारला. यावेळी त्यांना मालवाहू गोदाम परिसरात उभा दिसला. पोलिसांनी चालकास ताब्यात घेत मालवाहूची पाहणी केली असता यात रेशनच्या तांदळाचे १४६ कट्टे आढळून आले. पोलिसांनी चालक व क्लिनरला परवान्याची विचारणा केली असता चालकाने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले.
दरम्यान, रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करीत असल्याचे उजेडात येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहनासह तांदळाचे पोते असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला. या धक्कादायक कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

