आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात पावसाने 2 दिवसापासून अक्षरशः थैमान घातले आहे. जिल्ह्यातील सर्व नदी आणि नाले दुथडी भरून वाहत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहिली. जिल्ह्यात आणखी तीन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे
हिगणघाट तालुक्यात कुंभी या गावात 25 पेक्षा जास्त घरात नाल्याचे पाणी शिरल्याने प्रशासनाने घरातील सर्वांना लगतच्या शाळेत स्थलांतरित केले. हिंगणघाट शहरातील वेणा नदीला पूर आला आहे. नदी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थिकाणी राहण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. देवळी तालुक्यात सरुळ येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी वर्धा राळेगाव मार्ग बंद पडला. दरम्यान आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी गीरड येथे शेतात वीज पडल्याने दुर्गा ज्ञानेश्वर जंभुळे ही महिला ठार झाली. तसेच याच शेतात काम करणाऱ्या पाच महिला जखमी झाल्यात. त्यांना समुद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. देवळी तालुक्यातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरूनदेखील पाणी वाहत आहे. तसेच गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यापैकी गंगापूर गावाचा संपर्क तुटला आहे.
सेलू तालुक्यातील खडका येथे बोर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट ते येणोरा, कुंभी ते सातेफळ रस्ता बंद झाला आहे. तसेच पोहणा ते वेणी नाल्याला पूर असल्याने मार्ग बंद झाला आहे. सेलू तालुक्यातील जयपूर ते चारमंडळ रस्त्यावरील बोर नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावांंचा संपर्क तुटलेला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

