✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी ✒️
नाशिक:- जिल्हातील इगतपुरी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवाडी शिवारात एक अज्ञात कार जळालेल्या अवस्थेत आढळली असून यामध्ये एक व्यक्ती देखील पूर्णपणे जळालेले अवस्थेमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यात गाजलेल्या डॉ. सुवर्णा वाझे यांच्या खून प्रकरण घटनेची आठवण झाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या परिसरात आंबेवाडी शिवारात जळालेल्या अवस्थेत कार मिळाली असून त्यामध्ये एक व्यक्ती पूर्णपणे जळून गेलेली असल्याचेही आढळून आले आहे. दरम्यान कारसह एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरामध्ये चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सद्यस्थितीत जळालेली कार ही बिना नंबरची असून त्यातील एक व्यक्ती जळून खाक झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. ही घातपाताची घटना आहे की अपघात याबाबत सर्वत्र चर्चा असून जळालेली व्यक्ती कोण? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तो कोणाचा याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुवर्ण वाजे घटनेची पुनरावृत्ती?
दरम्यान काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुवर्ण वाजे यांचा मृतदेह देखील नाशिक मुंबई हायवे वर जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या ठिकाणी आलेल्या अवस्थेतील कार आढळून आली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता यामध्ये जळालेल्या अवस्थेत मृतदेह देखील आढळून आला होता त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. फॉरेन्सिक रिपोर्टमधून हा मृतदेह डॉक्टर वाजे यांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या पतीनेच खून करून डॉक्टर वाजे यांचा मृतदेह कारसह जाळून टाकले समोर आले. या घटनेमध्येही काहीच असंच प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.
