“शाळे बाहेरची शाळा’ या कार्यक्रमाचा 500 एपिसोड पूर्ण झाल्याचा उत्सव. मोठे झाल्यावर अजयला बनायचे आहे कृषी शास्रज्ञ
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आज दिनांक २६ ऑगस्ट २०२३ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा.ता. अहेरी, जिल्हा गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्याचा ४१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत ५००वा भाग प्रसारित झाला. अजय रमेश लावडे या विद्यार्थ्यांची व मार्गदर्शक सुरजलाल लिंगाराम येलमुले प्राथमिक शिक्षक यांची मुलाखत प्रसारित झाली.
शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम कोरोना काळात समग्र शिक्षा अभियान, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, नागपूर आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०२० पासून मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी सुरू झाला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमावर आधारित आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी टास्क दिला जातो व दुसऱ्या दिवशी तो अभ्यास वहीत सोडवून विद्यार्थी आणतात व प्रसारित होणाऱ्या मुलाखतीतून तो बरोबर आहे की नाही हे ऐकतात. विद्यार्थ्यांच्या मुलाखतीतून त्यांना बोलण्याची संधी मिळते. त्यांचे कौतुक केले जाते. याआधी याच शाळेतील रक्षा गुरनुले, राजमणी गुरनुले , पूजा वाडगुरे या विद्यार्थिनीची सुद्धा निवड झाली होती. अशातच अजय रमेश लावडे या विद्यार्थ्यांची आज ५०० व्या भागात मुलाखत प्रसारित झाली. त्याला त्याच्याच वर्गाचा अभ्यास दिला गेला होता व त्यांनी त्याची अगदी निर्भीडपणे उत्तरे दिली व भविष्यात कृषी शास्त्रज्ञ बनण्याची महत्त्वकांक्षा व्यक्त केली. तसेच या शाळेतील प्राथमिक शिक्षक व या शाळेचे मार्गदर्शक सुरजलाल येलमुले यांची सुद्धा मुलाखत प्रसारित झाली. या कार्यक्रमातून मुलांपर्यंत दररोज अभ्यास पोहोचवणे, निपुण भारत अंतर्गत माता पालक गटांच्या सभा व त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करत असतात.
या यशाबद्दल मार्गदर्शक आयुषी सिंग मुख्यकार्यकारी अधिकारी गडचिरोली, धंनजय चापले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, विवेक नाकाडे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, तसेच संपूर्ण डायट टीम गडचिरोली, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना रागिवार, गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे, केंद्रप्रमुख विनोद पुसालवार, बाबुराव कोडापे, बापू आत्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत सभावट, श्रीकांत पावडे प्रथम एज्युकेशन गडचिरोली, माता पालक यांनी कौतुक केले आहे व हा कार्यक्रम नेहमी सुरू राहावा. यासाठी नागपूर आकाशवाणी शाळेबाहेरच्या शाळेला खूप खूप शुभेच्छा दिल्या.

