🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे बंदुकीच्या धाकावर कोट्यावधीचा दरोडा टाकण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. ही रक्कम तब्बल साडेचार कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. बंदुकीच्या धाकावर 5 आरोपीने कोट्यावधीचा दरोडा टाकला. ही घटना घडल्यानंतर अवघ्या 5 तासांतच पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
5 आरोपीने एका कार मध्ये ठेवलेले साडेचार कोटी लुटून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या काही तासांत मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईत 3 कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही ताब्यात घेतलं आहे. तर 5 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या या दबंग कामगिरीनंतर 50 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे.
गुजरातचे व्यापारी कमलेश शहा यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या अठ्ठेसिंग सोलंके हा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नागपूर कार्यालयात काम करत आहे. नागपूर कार्यालयाचे नितीन जोशी यांच्याकडून 4 कोटी 52 लाख रुपये घेवून सोलंके हा कारने नागपूर येथून हैद्राबादकडे निघाला होता. वाटेत हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथे एक कार सायरन वाजवीत त्यांच्या मागे आली. त्यातून चार लोक उतरले. या चौघांनी प्लास्टिकच्या काठ्यांनी दरडावून अठ्ठेसिंग सोळंके यास गाडीतून खाली खेचले आणि मारहाण सुरू केली.
अठ्ठेसिंग सोलंके याच्या डोक्यावर बंदूक ताणत धमकी दिल्याने साडेचार कोटी रक्कम दिली. त्यानंतर चौघेही कारने पसार झाले. अठ्ठेसिंग सोलंके याने तत्काळ याबाबतची माहिती वडनेर पोलीसांना दिली. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथक सज्ज केले. या दहा पथकांनी लगतच्या जिल्ह्यात शोध सुरू केला. अवघ्या पाच तासात तीन आरोपी ताब्यात घेतले. पोलिसांनी तीन कोटी 46 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाईत 100 पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या 15 पथकांनी या प्रकरणाचा छडा लावला.वर्धा पोलिसांनी अल्प वेळेत वेगवान कारवाई केल्याने सर्वजण कौतुक करत आहेत.
वर्धा पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे तपास पथकाला 50 हजारांचा रिवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. आरोपींना नागपूरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. याकरिता नागपूर, अमरावती येथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. नागपूरहून हैद्राबादकडे जात असताना पोहणा शिवारात ही घटना घडली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

