✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
शिर्डी:- अतिक्रमणातून जुने ओढे, नाले मुक्त करण्याशिवाय पर्याय नसल्याने याबाबत मोहीम राबविली जाणार आहे. कोणाचेही असेल तरीही अतिक्रमण काढण्याच्या सूचना देत, नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी शिर्डी आणि परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. पाण्याला प्रवाह न राहिल्याने रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. जनजीवन विस्कळित झाल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांना खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी दिलासा देत संवाद साधला.
यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, कैलासबापू कोते, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, शिवाजी गोंदकर, अभय शेळके, नितीन कोते, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, रवींद्र गोंदकर, सुजित गोंदकर, सुधीर शिंदे, दीपक वारुळे, प्रतापराव जगताप, मधुकर कोते, हरिश्चंद्र कोते, रवींद्र कोते, दत्तात्रय कोते, पोपट शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कनकुरी रोडलगत लेंडी नाल्यासह नांदुर्खी पाटातून येणार्या पाण्याची खा. डॉ. विखे यांनी पाहणी केली. लेंडी नाल्याच्या पुरामुळे लक्ष्मीनगर येथे नागरिकांच्या घरांची पाहाणी करून, सर्व नागरिकांना एकसमान मदत देण्यात येईल. धान्य, पिण्याचे पाणी, तसेच नुकसानग्रस्तांना आपत्ती व्यवस्थापनाचे निकष व नियमाप्रमाणे मदत मिळवून देवू, अशी ग्वाही खा. डॉ. विखे यांनी दिली. नागरिकांना सध्या साई आश्रममध्ये स्थलांतरित करुन, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.

