अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- येथील एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. कर्तव्य संपवून घरी जात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला मागून दारू पिऊन येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक मारली, या धडकेत 8 महिन्याची गर्भवती असलेल्या महिला पोलीसाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अमरावती शहरात शनिवारी रात्री 2.00 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रियंका बोरकर वय 26 वर्ष रा.अमरावती असं मृत महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 26 वर्षीय प्रियंका बोरकर या अमरावती ग्रामीण पोलिसाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. मृतक या 8 महिन्यांच्या गर्भवती होत्या. शनिवारी रात्री 2.00 वाजताच्या सुमारास प्रियंका बोरकर या आपले कर्तव्य बजावून आपल्या पतीसोबत दुचाकीने घरी जायला निघाल्या होत्या. यावेळी शहरातील गाडगे नगर मंदिरा परिसरात त्यांची दुचाकीला मागून दारू पिऊन आलेल्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की प्रियंका यांच्या डोक्याला मार लागला. अपघातात त्यांच्या पतीला देखील दुखापत झाली. दरम्यान, दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना गर्भवती प्रियंका यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वार गौरव मोहोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. प्रियंका यांची कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ओळख होती. 8 महिन्यांच्या गर्भवती असताना देखील त्या कर्तव्य करत होत्या. त्यांच्या मृत्युने संपूर्ण जिल्हा तील पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

