युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- चालत्या रेल्वेतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे टीसीकडून कारवाई होण्याच्या भीतीने एका उच्चशिक्षित युवकाने धावत्या रेल्वतून खाली उडी मारली. त्यामुळे काही वेळ चालत्या रेल्वेत खळबळ उडाली आहे.
ही शरीरात थरकाप उडवणारी घटना मंगळवारी सकाळी 11.00 वाजता सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूर रेल्वे मार्गावर घडली. रेल्वेतून उडी मारणारा युवक जबर जखमी झाला आहे. महेश संतोष सोनी वय 22 वर्ष, रा. रिवा मध्यप्रदेश असे जखमी तरुणाचे नाव आहे.
महेश संतोष सोनी हा युवक मुळचा रिवा येथील रहिवासी असून, त्याचे आईवडील दत्तवाडी भागात रोजगाराच्या निमित्ताने राहतात. महेश रिवा येथे एमएससी करतो आहे. दिवाळीच्या कारणाने सोनी परिवार आपल्या मुळगावाला रिवा येथे गेले होते. महाराष्ट्र एक्सप्रेसने ते मंगळवारी नागपूरला परत येत होते.
आईवडीलांसोबत महेशही नागपूरला येत होता. कन्हान- कामठी दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये तिकिट चेकर (टीसी) ने महेशच्या आईवडिलांकडे तिकिटाची विचारणा केली. तिकिट नसल्याने महेश घाबरला. टीसी दरडावणीची भाषा करत असल्यामुळे तो कारागृहात डांबणार, अशी भीती वाटल्याने महेशने धावत्या ट्रेनमधून खाली उडी घेतली. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
धावत्या ट्रेनमधून युवक खाली पडल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी आरडाओरड केली. परंतू कुणीही धोक्याचे संकेत देणारी डब्यातील साखळी ओढण्याचे प्रसंगावधान न दाखवल्याने ट्रेन तशीच पुढे निघून कामठी स्थानकावर गेली. आईवडिलांकडून आरडाओरड झाल्याने रेल्वे सुरक्षा दलाने खाली पडलेल्या युवकाकडे धाव घेतली आणि त्याला तातडीने उचलून आधी रेल्वे रुग्णालयात आणि नंतर कामठीच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर त्याला नागपूरच्या मेयो ईस्पितळात हलविले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेच्या वेळी कामठी रेल्वे स्थानक जवळ असल्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला होता. त्यामुळे महेशला जबर दुखापत झाली असली तरी त्याच्या जिवाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, घटनेची माहिती कळताच ईतवारी रेल्वे ठाण्याचे सहायक निरीक्षक एन. डोळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

