आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मुंबई:- सिडकोच्या गृहप्रकल्पात पत्रकारांना घर घेण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील सदनिका मिळण्याचा मार्ग सुलभ व्हावा, या दृष्टीने पात्रतेची अट शिथिल करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पत्रकारांना घर घेणे आता सोयीचे होईल. सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील पत्रकार प्रवर्गातील घरासाठी अर्ज करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार यापुढे सिडको महामंडळाकडूनच योग्य ती शहानिशा करून पत्रकारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. घराच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक पत्रकारांना या नव्या निर्णयाचा फायदा होणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांना बजेटमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. या गृह प्रकल्पात विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात. यापूर्वी पत्रकारांना, पत्रकार प्रवर्गातील सदनिकेसाठी अर्ज करताना महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून संबंधित अर्जदार पत्रकार प्रवर्गातील असल्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक होते. परंतु विविध कारणामुळे ही प्रक्रिया वेळ काढूपणाची ठरत असल्याने पत्रकारांना पात्रता प्रमाणपत्र सादर करणे अडचणीचे ठरत होते. परिणामी अनेक पत्रकारांना घराच्या लाभापासून वंचित राहावे लागत असे. पत्रकारांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सिडकोला काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानुसार सिडकोने माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सिडकोकडूनच निश्चित केली जाणार असल्याने पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळीही राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार पत्रकारांना सिडको गृहनिर्माण योजनेतील घरे घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने पात्रतेची अट शिथिल केली आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

