भारतीय संविधानच भारताचा सर्वोच्च कायदा – प्रा. विठुल कांगणे
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. युवकांनी संविधान साक्षर होऊन सर्व सामान्य लोकांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा. विठ्ठल कांगणे परभणी यांनी केले.
विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तर्फे 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिननिमित्त आयोजित व्याख्यान व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक डायमंड गॅलेक्सी संकुलाच्या पटांगणावर करण्यात आले होते . यावेळी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते प्रा .विठ्ठल कांगणे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जगदिश वांदीले हे होते तर प्रमुख उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक टेंभुर्णे, कवी मजीदबेग मुगल, अँड. विजय ढेकले, क्रिष्णा धुळे, जितु कामडी, डॉ. सोनम मेंढे, विवेक कांबळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा .विठ्ठल कांगणे पुढे म्हणाले, २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणां मध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधान लिहले आहे. विध्यार्थी वर्गाने संविधान वाचून देशाची प्रगती करण्यासाठी व लोकशाही ची मूल्ये जोपासने गरजेचे आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेन्द्र रंगारी यांनी केले तर प्रास्ताविक सुरेश भगत यांनी केले व आभार राष्ट्रपाल कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद जागलान , मनोज भोयर, मिथुन मून, संजय चाटे, प्रल्हाद मेश्राम, राहुल लोहकरे, कांतीलाल देवढे, नाना कुत्तरमारे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा समारोप संविधानाची उद्देशिका वाचून करण्यात आले.

