युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:– पंचायत समिती सावनेर येथे आयटक संघटनेच्या वतीने श्याम काळे यांच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवावेत यासाठी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्यात निवेदन दिले होते.
परंतु त्यांच्या मागण्यावर कोणताही निर्णय न झाल्याने ४ डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आपिला मधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी. शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात यावेत. अंगणवाडी सेविकाना व मदतनीसाना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करावी. सेविकांचे मानधन किमान २६ हजारापर्यंत करावे. मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी. अंगणवाड्यांसाठी किमान रु ५००० ते ८००० भाडे मंजूर करावे. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा.
या मागण्या आहे.
२४ दिवसापासून ठीय्या आंदोलन सुरू असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सुनिता पाटील,सचिव चंद्रप्रभा लोधी यांनी दिली. यावेळी कुंदा लांबट, सुशीला सहारे, कीर्ती टाकळखेडे,ममता चवारे, जयमाला तागडे व मीना आपटे यांच्या सह ४०० च्या वर महिलांच्या उपस्थितीत कागद पत्र जाळून होळी केली. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण करतच राहु. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

