शांतता व सुरक्षेसाठी वर्धा जिल्ह्यात 46 ठिकाणी नाकाबंदी, 50 अधिकारी आणि 316 पोलिस कर्मचारी तैनात
आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, अन्यथा कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी शनिवार पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिले.
यावेळी पोलिस अधीक्षक हसन म्हणाले की, नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साही आहेत. शांतता व सुरक्षेसाठी जिल्ह्यात 46 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यासाठी 50 अधिकारी आणि 316 पोलिस कर्मचारी तैनात आहेत. जिल्ह्यात दारूची वाहतूक होऊ नये यासाठी तालुक्याच्या सिमांवरही नाकाबंदी राहणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉज आणि पर्यटनस्थळी बंदोबस्त राहणार असून प्रत्येक उपविभागात पोलिस अधिकारी आणि 110 कर्मचारी तैनात राहतील.
हिंगणघाट, आर्वी आणि पुलगाव येथे स्ट्राईकींग फोर्स लावण्यात येईल. गुन्हे शोध पथकाकडून धाडीसाठी वेगवेगळे पथक तयार करतील. आरसीबीच्या पथकासह एक क्राईम इंटेलिजन्सचे पथकही तयार करण्यात आले आहे. या फौज फाट्याच्या माध्यमातून नाकाबंदी, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह तसेच दारू तस्करांवर पायबंद घालण्यात येणार असल्याचेही हसन यांनी सांगितले. सोशल मीडियावर असामाजिक तत्त्वांच्या हालचालींवर सायबर सेलमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

