राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ज्यांची ओळख होती. शिवसेनेचे वांद्रे खेरवाडी येथील माजी नगरसेवक, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे दुःखद निधन झाले. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते त्यांचे दीर्घ आजारानंतर सोमवारी पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सरमळकर यांनी नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मार्च २०११ मध्ये ते शिवसेनेत परतले होते.
माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवारी २३ जानेवारी रोजी सकाळी 10.30वाजता वांद्रे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.
कोण होते श्रीकांत सरमळकर: नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या महत्वाच्या नेत्यांपैकी श्रीकांत सरमळकर एक होते. मात्र काँग्रेसचा हात सोडत मार्च २०११ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पुन्हा शिवसेना प्रवेश केला होता. शिवसेनेच्या पहिल्या पिढीतील आक्रमक शिवसैनिकांमध्ये सरमळकर यांचा समावेश होता. सरमळकर हे १९८५ साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून तर १९९० मध्ये ते वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते.
सरमळकर हे नगरसेवक असताना पालिका मुख्यालयाखाली त्यांना अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. गैरसमजातून या गोळ्या घालण्यात आल्या होत्या. गोळ्या कुणी घातल्या हे पुढे पोलिस तपासातही समजू शकले नाही. गेली तीसहून अधिक वर्ष सरमळकर यांच्या शरीरात त्या गोळ्या होत्या. शरीरात गोळ्या घेऊनच ते जगत होते, अशी माहिती सरमळकर यांचे सहकारी माजी नगरसेवक के. पी. नाईक यांनी दिली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सरमळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “खेरवाडीचे माजी आमदार, माझे जुने सहकारी श्रीकांत सरमळकर ह्यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे जाणे वेदनादायी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सरमळकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. भावपूर्ण श्रद्धांजली”

