अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा करून तस्करी करून निसर्गाची हानी आणि शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे महसूल विभागाने या रेती तस्करावर धडक कारवाई सुरू केली आहे.
महसूल पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील मौजा कापसी येथील रेती घाटावर पहाटे गुप्तपणे धाड टाकून अवैधपणे रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या 6 ट्रॅक्टर वर कारवाई केली. सदर सहाही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय हिंगणघाट येथे जमा करण्यात आले. सदर ट्रॅक्टर मालक हे राळेगाव जिल्हा वर्धा येथील असल्याचे समजते. त्यांच्यावर प्रत्येकी 123100 रूपये असा एकूण 738600 रूपये इतका दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली.
सदर कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व तहसीलदार सतीश मासाळ यांचे मार्गदर्शन मध्ये नायब तहसीलदार सागर कांबळे, भलावी, तलाठी सय्यद, बीमरूट, झोरे व खंडाते यांनी केली.
एकाच वेळी सहा ट्रॅक्टरवर कारवाई झाल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथक निर्माण केले असून त्याद्वारे रेतीघाटची नियमित तपासणी केली जात आहे. तसेच अवैध उत्खनन रोखण्याकरिता रेती घाटातील रस्त्यावर जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डे खोदून प्रतिबंध निर्माण केला आहे.

