लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे पाच सेंटीमीटर उघडले 12 घनमीटर प्रतिसेकंद ने पाण्याचा विसर्ग सुरू.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्ध्याच्या लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जल पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे लाल नाला धरणाचे 5 दरवाजे 5 से.मी. ने उघण्यात आले असून या धरणातून 12.12 घनमीटर प्रती सेकंद नुसार विसर्ग सुरू आहे.
लाल नाला, पोथरा नदि, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आलाय.
पोथरा धरण 100 टक्के भरले: पोथरा धरण हे 85 टक्के भरलेले आहे आणि आज 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठा वरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पोथरा नदीला पूर आला असून सावंगी, सायगव्हाण, पिंपळगाव, लोखंडी या गावाचा संपर्क तुटला आहे.
वाहतूक ठप्प, शेतातील पिके पाण्यात: वर्धा जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तसेच झाल्याने ग्रामीण भागाची दैना उडाली असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सकाळी पाच तास वृष्टी झाली. त्यानंतर रात्रीपासून सूरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी रात्री पासून सार्वत्रिक संततधार असल्याने सर्वच तालुक्यात जनजीवन ठप्प झाले आहे. रात्री पासून झड म्हणून विविध धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहेत. पोथरा धरण ८५ टक्के भरले असून आज १०० टक्के भरण्याची शक्यता गृहीत धरून नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.
लाल नाला प्रकल्पा च्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस बरसला. म्हणून जालशय पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. पाच घनमीटर प्रती सेकंद विसर्ग सूरू झाल्याने पोथरा व वर्धा नदी काठच्या गावकऱ्यांना सावधान करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही धरण क्षेत्रात ११२ मि मि. पावसाची नोंद झाल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचे म्हटल्या जाते.
नांद प्रकल्पाच्या क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने सात दरवाजे आज उघडण्यात आले. नदी पात्र ओलांडू नये असा ईशारा देण्यात आला आहे. टाकली बोरखेडी, पंचधारा, शिरुड, डोंगरगाव, बोर, निम्न वर्धा, कार हे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. सेलू तालुक्यातील वडगाव, रेहकी, सुरगाव, कान्हापूर, महाबला, कोटंबा, इंदापूर, बेलगाव, सुकळी, वाहिदपूर, दौलतपूर, मोर्चापूर, गोंदापूर, जयपूर, चारमंडळ, गायमुख, चिंचोली, महागाव, पिंपळगाव, पाहिलापूर व अन्य गावातील पिके भरडून निघाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. सेलू शहर तर कालच्या प्रमाणे आजही तलाव झाल्याचे चित्र आहे. एकूण ५६६ मि मि ची पर्जन्य नोंद आहे.
हिंगणघाट तालुक्यात सावली, वाघोली, वडनेर, अल्लीपूर, सिरसगाव, पोहना व कानगाव ही मंडळे अतिवृष्टीने धुवून निघाली आहे. हिंगणघाट ते उमरी, वॉलधुर–पिंपळगाव, भोसा-सिंदी, कुंभी सातेफळ, मांडगाव_पेठ व अन्य ग्रामीण रस्ते आज बंद पडले आहेत. हिंगणघाट तालुक्यातील मानोरा ते काजळसरा रस्त्यावरील पुलास अतिवृष्टीने भगदाड पडले आहे. बांधकाम विभागास याबाबत हालचाल करण्याची सूचना झाली आहे.
तालुक्यातील लेंढी नाल्या पलीकडे पेठ येथे ७०० घरांची वस्ती आहे. येथील पूल पाण्याखाली गेल्याने लोकांची कोंडी झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी अतिवृष्टीने पर्जन्य स्थितीत काही भागात पाहणी केली. पण सर्व नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करीत आपण वारंवार आढावा घेत असल्याचे नमूद केले. सेलू शहरास बसलेला पाण्याचा विळखा आज परत मुसळधार झाल्याने घट्ट झाला. काही शासकीय कार्यालये पण पाण्याखाली गेल्याने सर्व काम ठप्प पडले आहे.

