जळगाव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- राज्यात विधानसभा निवडणुकीत मत पडायला अवघे 3 दिवस शिल्लक असताना रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार करताना 12 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर सभेत काँगेसच्या एका नेत्याने वंचित बहुजन आघाडीवर विवादित टिप्पणी केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. काँग्रेस उमेदवार आणि विवादित भाषण देणाऱ्या नेत्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून तब्बल नऊ तासानंतर वंचित बहुजन आघाडीच्या रावेर येथील राज्यातील पहिली तृतीयपंथींय उमेदवार शमिभा पाटील यांनी आंदोलन केले अखेर रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय शिरीष चौधरी यांना नोटीस जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या नोटिशीत नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत खुलासा अर्ज सादर करण्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौधरी यांना सूचना दिली आहे.
काय आहे हे प्रकरण?: निवडणूक अधिकाऱ्यांनी धनंजय चौधरी यांना दिलेल्या नोटिशीनुसार शमिभा भानुदास पाटील यांच्यातर्फे दिशा पिंकी शेख यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे एक तक्रार केली होती. या तक्रारीनुसार 12 नोव्हेंबर 2024 रोजी रावेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी याच्या प्रचारार्थ फैजपूर येथे एक सभा घेण्यात आली होती. या सभेत राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढ हे उपस्थित हेते. यावेळी मुकूंद सपकाळ यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने भाजपा पक्षाकडून पैसा घेतल्याचा आरोप केला. तसेच प्रचार यंत्रणा व गाड्या यासंबंधीही सामाजात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे सामाजिक असुरक्षितता निर्माण झाल्याचा आरोप शमिभा पाटील यांनी केला होता.
विवादित भाषण करणाऱ्यावर निवडणुक विभागाने कारवाई करावी यासाठी शमिभा पाटील यांनी 16 नोव्हेंबर रोजी आंदोलन पुकारले होते. धनंजय चौधरी जोपर्यंत माफी मागत नाहीत किंवा खुलासा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शमिभा पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख यांनी घेतली होती. याच आंदोलनाची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्याने धनंजय चौधरी यांना नोटीस दिली आहे. या नोटिशीनुसार धनंजय चौधरी यांना 24 तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
20 तारखेला मतदान उमेदवारात घबरावट?: 24 तासात उत्तर द्यावे असे पत्र निवडणुक अधिकारी यांनी दिल्याने उमेदवारात घबरावट निर्माण झाली आहे. त्यात 18 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

