राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मागील अनेक दिवसांपासून डिजिटल अरेस्टच्या घटनेने धुमाकूळ घातला आहे. यात अनेक उच्चशिक्षित तरुण, तरुणी, महिला, वृद्धासह सरकारी कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करून लुटल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे.
अशीच एक खळबळजनक घटना मुंबईतील अंधेरी येथून पुढे आली आहे. सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगत अंधेरीतील मूलीला हॉटेलमध्ये विवस्त्र होण्यास भाग पाडले. तिचे व्हिडिओ शूट करून हा व्हिडिओ तिच्याच संपर्कातील लोकांना पाठवून व्हायरल केला गेला. अटकेची आणि बदनामीची भीती दाखवून तिच्याकडून 2 लाख रुपये लुटण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
ही मुलगी अंधेरी मधील एका खासगी कंपनीत काम करते. तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरून फोन करणाऱ्याने तिला दिल्ली सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. एका गुन्ह्यात तुमचा सहभाग असून यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगताच ही मुलगी खूप घाबरली. तिची चौकशी करावी लागेल असे म्हणत अधिकाऱ्याने व्हिडिओ कॉल केला. हे प्रकरण गंभीर असल्याने चौकशी गोपनीय पद्धतीने होईल असेही तिला सांगितले गेले. एका हॉटेलमध्ये खोली बुक करा आणि कोणालाही याची माहिती देऊ नका असे सांगत तिला एकटीला हॉटेलमध्ये जाण्यास आरोपींनी सांगितले.
आपल्याला अटक होईल या भीतीने मुलगी हॉटेलमध्ये गेली. तिथे तिला पुन्हा व्हिडिओ कॉल आला. नरेश नावाच्या व्यक्तीने मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगत तिच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर तरुणीच्या खात्यातून 1 लाख 78 हजार रुपये काढण्यात आले.
बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर मुलीला तिची अंगझडती घ्यावी लागेल असे सांगितले. यासाठी तिला कपडे उतरवायला लावले. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या मुलीने कपडे काढले. तर आरोपीने तिचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ बनवल्याच समजताच या मुलीला धक्का बसला. यानंतर या मुलीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. अंधेरी पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
डिजिटल अरेस्टला बळी पडू नका: महाराष्ट्र संदेश न्युज सर्व नागरिकांना आव्हान करते की पोलीस, सीबीआय, किंव्हा इतर कुठलेही पोलीस तुम्हाला कॉल करून अरेस्ट करू शकत नाही. त्यामुळे असे कॉल आले तर आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.
