✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी
मुंबई:- एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल आणि जवळ पैसे नसतील, तर आधीचे लोक सावकाराकडून पैसे घ्यायचे. कालांतराने बँकांनी ही जागा घेतली. पूर्वी कर्जे घेण्यासाठी बँकांची प्रक्रिया खूप किचकट असायची, परंतु आता यात ग्राहकांच्या सोईचे बरेच बदल झाले आहेत, त्यामुळे अगदी काही मिनिटांत फोनवर प्रक्रिया करूनही बँकेकडून लोन मिळवता येतं. बँकेकडून तुम्ही Home Loan, Business Loan, Personal Loan घेऊ शकता. लोन घेताना त्याबद्दलचे काही नियम असतात. समजा एखाद्या व्यक्तीने बँकेतून कर्ज घेतलंय; पण ते कर्ज फेडण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला तर त्या कर्जाचं काय होतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. काहींना वाटतं की बँक ते कर्ज माफ करते, पण तसं नाहीये. बँक त्या कर्जाची पूर्ण रक्कम वसूल करते.
बँकेकडून कार लोन, होमलोन, बिझनेस लोन यापैकी कोणतंही कर्ज घेतल्यावर त्याची परतफेड करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर बँक कर्ज माफ करत नाही. कर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला कर्जाची परतफेड करावी लागते. अशा कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने अनेक वेगवेगळे नियम केले आहेत. आजकाल होम लोन व कार लोन देतानाच त्याचा टर्म इन्शुरन्स (Term Insurance) काढला जातो, त्यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्सचे पैसे भरून प्रॉपर्टी कर्जमुक्त करता येते.
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याची सर्व संपत्ती त्याच्या वारसांकडे जाते. अशा स्थितीत संपत्तीसह कर्ज फेडण्याचा भार वारसावर येऊन पडतो. कर्जाबरोबर जर विमा असेल तर विमा काढलेल्या पैशांतून कर्जाची परतफेड सहज करता येते. होम लोन घेताना टर्म इन्शुरन्स केला नसेल तर घर बँक कुर्की करून त्याचा लिलाव करते आणि कर्जाचे पैसे वसूल करते.
इतर कर्ज कशी वसूल केली जातात?
जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून बिझनेस लोन घेतलं असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल, तर अशा परिस्थितीत त्याचं कुटुंब हे कर्ज फेडण्यास सक्षम आहे की नाही, याची तपासणी बँक करते. जर ते कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत नसतील, तर बँक कर्जाची वसुली मालमत्ता, सोनं (Gold), शेअर्स (Shares), एफडी इत्यादींच्या माध्यमातून करते. कारण ते बिझनेस लोन घेताना गॅरंटी म्हणून ठेवलेलं असतं.
अनेकजण कर्ज घेताना इन्शुरन्स घेतात, अशावेळी उर्वरित रक्कम या इन्शुरन्सच्या माध्यमातून वसूल केली जाते. दरम्यान, क्रेडिट कार्डवरचे बाकी असलेले पैसेदेखील मृतांच्या वारसांना द्यावे लागतात. तसंच, पर्सनल लोनमध्येही हाच नियम पाळला जातो.

