राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था गरीब आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. तर दुसरीकडे शासनाच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेचा अभाव असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक वेळा सरकारी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतात, रुग्णालयात डॉक्टर असले तर सुविधा नसतात. तर, काही वेळा संबंधित डॉक्टर हे खासगी रुग्णालयांना रेफर करतात. त्यातच महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतून आरोग्य व्यवस्थेची पुर्णत वाताहत झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई येथील एका सरकारी रुग्णालयात चक्क सफाई कर्मचारी रुग्णांची तपासणी करत असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या गोवंडी मधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची तपासणी सफाई कर्मचारी करत आहे. हा सफाई कर्मचारी रुग्णांचे ईसीजी (ECG) करत आहेत. ईसीजी काढण्यासाठी तंत्रज्ञ कर्मचाऱ्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी त्याची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते. परंतु, हा सफाई कामगार असल्याचे दिसून आल्याने समाजवादी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्धीकी यांनी हा प्रकार समोर आणला आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात, परंतु या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन कराव्या लागत आहेत. त्यातच, येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी सफाई कर्मचारी करत असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील भीषण वस्तुस्थितीच समोर आली आहे.
रुकसाना सिद्दिकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले यांना याबाबत विचारणा केली असता, डॉक्टर कर्मचारी यांची कमतरता आहे आणि ह्या सफाई कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण दिलं आहे, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने शासकीय रुग्णालयात नेमकं काय चाललयं, असा गंभीर प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे सफाई कर्मचारीच गेले काही दिवस हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी रुक्साना सिद्दिकी यांनी केली आहे.

