माजी आमदार रिपब्लिकन नेते उपेंद्र शेंडे यांच्या श्रद्धांजली सभेत रिपाई नेत्याचे प्रतिपादन.
प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रिपब्लिकन पक्षाचे ते नेते होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत काम केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या चळवळीत उपेंद्र शेंडे यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. उत्तर नागपूर मतदारसंघातून 1990 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यांची श्रद्धांजली सभा नुकतीच पार पडली. या सभेत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची दमदार भाषणे झाली. सर्वांनीच रिपाइंचे एक्य व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.
रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि लॉंग मार्चचे नेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे हे हिंदुत्ववादी पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. उद्या ते बौद्ध धम्माचा त्याग करून हिंदुत्वाची शपथही घेतील, त्यांची काही गॅरंटी देता येत नाही, असे सांगून रिपब्लिकन पक्षाचे नेते उत्तमराव गवई यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांना राजीनामे देऊन एकत्र येण्याचे आवाहन करून सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घातले.त्यामुळे नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.
मात्र, या सभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते उत्तमराव गवई यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेख कुंभारे, माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्यासह मंचावर उपस्थित सर्वच नेत्यांना हिंदुत्वादी संघटनेशी संबंध तोडण्याचे खुले आवाहन केले. ज्या हिंदुत्ववादी पक्षाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहोत, हे बघता उद्या तुम्ही बौद्ध धम्म त्यागून हिंदुत्वाची शपथ घेणार नाही, याची काही गॅरंटी देत येत नाही. ज्यांना खरोखरच रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य हवे त्यांनी तत्काळ हिंदुत्वावादी पक्षासोबतचे संबंध तोडावेत. मग तो पक्ष भाजप असो की शिवसेना, काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस असेही ते म्हणाले.
उरतो प्रश्न तो वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांचा. त्यांना कसे निपटवायचे? हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या जनतेला चांगलेच ठावूक आहे. मात्र, त्यापूर्वी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, तेसुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे उतरवून, असेही ते म्हणाले
उपेंद्र शेंडे विधानसभेत निवडून आले होते. ते नागपूर लोकसभा मतदारसंघातूनही निवडून आले असते. मात्र, आपल्याच नेत्यांनी त्यांच्यासोबत बेईमानी केली, असाही आरोप या वेळी उत्तमराव गवई यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची शकले झाले आहेत. शेकडो गट आणि नेत्यांमध्ये हा पक्ष आता विखुरला गेला आहे. काही नेते काँग्रेस, कोणी भाजप तर काहींनी राष्ट्रवादीला जवळ केले आहे. यापैकी काही मंत्री, आमदार झाले. कोणाला राजकीय लाभ मिळाले आहे.
प्रत्येक वेळी निवडणूक आली की रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नारा दिला जातो. बैठका घेतल्या जातात. एकमेकांना एकत्र येण्याचे आवाहन केले जाते. त्यापुढे चर्चा सरकतच नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार निवडून येणे, आता अवघड झाले असल्याची खंतही या कार्यक्रमातून अनेकांनी व्यक्त केली.

