अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘वाचन ही ज्ञानभांडाराची गुरुकिल्ली आहे’, ‘वाचाल तर वाचाल’, ‘वाचेल तो टिकेल’ हे सर्वश्रुत आहे. मात्र अलीकडे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसून येत आहे. वाचनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन प्रतिवर्षी महाराष्ट्र सरकार वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. ‘वाचन संस्कृती महाराष्ट्राची पंधरवाडा’ राबवण्याच्या पाठीमागे वाचन विषयक जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या ठिकाणी वाचनाची आवड निर्माण करणे व समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणे हाच उद्देश आहे.
मातोश्री महिला महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून म.गांधी सार्वजनिक वाचनालय हिंगणघाट द्वारे आयोजित ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली. व M.O.U. अंतर्गत संयुक्तपणे वाचन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मातोश्री महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ.सुनंदा गिरडे, प्रा.मीनाक्षी जीडगिलवार, प्रा. राकेश लोणकर, प्रा. अभिजीत डाखोरे, राजेंद्र डागा, प्रा.खडसे, म. गांधी वाचनालय, हिंगणघाटचे ग्रंथपाल रमेश झाडे, शहरातील इतर मान्यवर वाचक वर्ग व मातोश्री महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथांचे मानवी जीवनातील महत्त्व जाणून घेतले. मातोश्री महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. नेहा खोंडे, निर्झरा येरणे, खुशी कचवे, अवंती लढी, प्रिया यादव इत्यादींनी आपल्या भाषणातून तसेच कविता व गीत गायनातून वाचनाचे महत्त्व प्रतिबिंबित केले.
ग्रंथपाल डॉ. सुनंदा गिरडे यांनी ग्रंथ हे माणसाचे खरे मित्र कसे असतात हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत डाखोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातोश्री महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी तसेच महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथपाल व सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

