भास्करराव भीमनवार व रमेशकुमार गोयनका स्मृती पुरस्कार वितरण.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे शिक्षणाचे उत्कृष्ठ कार्य करणा-या शाळांमध्ये प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन संस्थेचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. संस्थेने गेल्या पाच दशकापासुन ग्रामीण भागातील बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण करुन दिली आहे. यापुढे संस्थेने महाविद्यालय सुरु करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गावातच शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या असे, प्रतिपादन गृह (ग्रामीण) गृहनिमार्ण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी भास्करराव भीमनवार व रमेशकुमार गोयनका स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्था हिंगणघाट व भारतीय युवा संस्कार परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त व्याख्यान व भास्करराव भीमनवार व रमेशकुमार गोयनका स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला सर्वश्री आमदार समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमीत वानखेडे, दिल्लीचे माजी खासदार राज्यसभा डॉ. राकेश सिन्हा, प्रसिध्द महिला उद्योजिका प्रेमलतादेवी मोहता, उमेद प्रकल्पाच्या संचालीका मंगेशी मुन, प्रोग्रेसिव्ह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुलदास राठी, संस्थेचे सचिव रमेश धारकर, भारतीय युवा संस्कार परिषदेचे राष्ट्रीय केंद्रिय अध्यक्ष शरद कुहीकर, श्याम भिमनवार, भारत विद्यालयाचे प्राचार्य राजु कारवटकर आदी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट ही औद्योगिक नगरी म्हणुन प्रसिध्द असून येथील उद्योजकांनी उद्योग व व्यावसायिक क्षेत्रात पुढे येऊन राज्यात हिंगणघाट मॉडेल म्हणुन उभे राहण्यासाठी प्रयत्न करावे. यासाठी शासनाच्यावतीने मदत करण्यात येईल. समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना न्याय देण्यासोबतच विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करणार असल्याचे पुढे बोलतांना डॉ. पंकज भोयर म्हणाले.
राम, कृष्ण व शिव हे मुल्याचे प्रतीक असून ते विचारधार तयार करुन गेले. आपण स्वत:ला सशक्त तयार करुन मुल्यांचे निर्माण करा. त्याचे भवन बनविल्यास देश मजबूत होईल. इतिहासाच्या पोटात अनेक नायक व घटना लपून असून त्या जनतेसमोर यायला पाहिजे तर एका उत्तम सुसंस्कारीत समाजाची निर्मिती शक्य आहे. समर्थ रामदास यांनी दासबोधातून पुरुषार्थाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. कोल्हे, कुत्रे हे केवळ समाजाच्या अंधपतनाचे कारण आहे. त्यासाठी मुल्यावर आधारीत समाजाची निर्मिती झाल्यासच भारताचा उध्दार होईल, असा विश्वास डॉ.राकेश सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने व आमदार सुमित वानखेड यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उमेद संकल्प प्रकल्प रोठाच्या संचालिका मंगेशी मुन यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन मनीषा कोंडावार यांनी केले तर आभार प्रदिप नागपूरकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

