राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चंद्रपूरात काँग्रेसचे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीविरोधात निदर्शने.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निष्पक्ष निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी करीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस व जिल्हा शहर काँग्रेस च्या वतीने गांधी चौक चंद्रपूर येथे भारत निर्वाचन आयोगाविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आयुक्त, भारत निर्वाचन आयोग यांना निवेदन देण्यात आले व देशातील तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांत निवडणूकात निवडणूक आयोगाची भुमिका ही पक्षपाती दिसून आली. त्यामुळे आयोगाने आपले कर्तव्य निष्पक्षपणे पार पाडावे अशी मागणी करण्यात आली. यानंतर विश्रामगृह चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हा काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली.
निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापन केली आहे परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता पक्षपाती दिसून येते आहे. त्यामुळे भाजप काळात निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर संशय बळावला असून देशातील सर्व सामान्य जनतेचा व मतदारांचा विश्वास निवडणूक आयोगाने गमावल्याचे दिसून येते तसेच लोकशाहीची हत्या होत आहे असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह, चंद्रपूर येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल ५० लाख मतांची वाढ कशी झाली ? मतदानादिवशी संध्याकाळी ५ वाजता जाहिर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यातमध्ये मोठी तफावत आहे. यातही ७६ लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदार दिसून आलेत, सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारयाद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही, आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे असे मत व्यक्त केले.
तर निदर्शनात सहभागी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुध्दा निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लोकशाही टिकून राहण्यासाठी तसेच जनभावनेचा सन्मान करण्यासाठी आयोगाने निष्पक्षपणे कार्य करण्याची गरज स्पष्ट केली.
या प्रसंगी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, विनायक बांगडे, चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष रीतेश तिवारी, विनोद दत्तात्रय, चंदाताई वैरागडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, कामगार नेते के. के. सिंग, प्रवीण पडवेकर, संतोष लहामगे, सुनीता लोढीया, नंदू नागरकर, नरेंद्र बोबडे, अब्दुल शेख, ओबीसी काँग्रेसचे राहुल चौधरी, गोपाल अमृतकर, राजेश अडुर, अनुसूचित जाती विभागचे गुंजन येरमे, किसान काँग्रेसचे भालचंद्र दानव, कुणाल चहारे, सुलतान अशरफ अली, शिवा राव, प्रशांत दानव, सुनिता अग्रवाल, वंदना भागवत, ललिताजी, संगीता भोयर, शालिनी भगत, महेक सय्यद, मिनाक्षी गुजरकर, कविता खडसे यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, जिल्हा शहर काँग्रेस तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंट आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

