पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. येथे रेल्वेत तिकीट तपासणीच्या नावावर प्रवाश्यांना लुबाडणारा नकली टीसी ला नागपूर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या खोट्या टीसीवर रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जीआरपीएफच्या ताब्यात दिले आहे.
हा नकली टीसी बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होता. या तोतया टीसीचे नाव संयोग कुमार साहू असे असून तो मूळचा रायपूर येथील रहिवासी आहे. तो टीसी चे बनावट ओळखपत्र वापरुन तो प्रवाशांकडून दंड वसुली करत होता. बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस दरम्यान त्याचा फसवणूकीचा प्रकार सुरु असताना रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी संयोग कुमार हा टीसी ज्याप्रमाणे काळा कोट घालतात, तसा काळा कोट घालून उभा होता. त्याच्याकडे रेल्वेचे बनावटी आयडी कार्ड ओळखपत्र देखील होते. तो लोकांचे तिकीट तपासण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करत होता. त्याच्या संशयास्पद वागणूकीमुळे काही प्रवाशांना याच्यावर शंका आली. प्रवाशांनी त्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्यांकडे केली.
त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून आरोपीची चौकशी केली. चौकशी सुरु असताना त्याने तोतया टीसी असल्याची कबूली दिली. पुढे रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही माहिती नागपूर रेल्वे मंडळातील सुरक्षा पथकाला दिली. पथकाने त्वरीत धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली.

