महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- महाराष्ट्रातील बुलढाणा येथून जगातील सर्वात दुर्मिळ घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाही हैराण झाली असून, डॉक्टरही चक्रावले आहे. कारण हा असा दुर्मिळ प्रकार इथं पूर्णपणेच अनपेक्षित होता. बुलढाणा येथील एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी रिपोर्टने डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. गर्भवती महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्याही पोटात एक बाळ असल्याचं सोनोग्राफी मध्ये दिसून आलं. वैद्यकिय भाषेत अशा प्रकरणाला ‘फीट्स इन फिटु’ असं म्हटलं जातं.
प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा जिल्हातील मोताळा तालुक्यातील एका गावात दोन आठवड्यांपूर्वी एक 32 वर्षीय 9 महिन्यांची गर्भवती महिला शासकीय रुग्णालात चेकअप करण्यासाठी आली यावेळी डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी या गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली आणि त्याचवेळी त्यांना काहीतरी संशयास्पद गोष्ट आढळली. महिलेच्या गर्भामध्ये एक बाळ दिसलं, सोबतच या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ दिसलं आणि हे दृश्य पाहून डॉक्टरही हैराण झाले.
बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात राहणाऱ्या या महिलेने नियमित तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले होते. सोनोग्राफी तपासणीदरम्यान डॉक्टरांना ही बाब लक्षात आली. सोनोग्राफी करणारे डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी निरीक्षणादरम्यान वारंवार तपासणी केली असता, सोनोग्राफीमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे स्पष्ट दिसून आले. 35 आठवड्यांहून अधिकच्या या गर्भांमध्ये काही हाडे आणि गर्भासारखी रचना दिसून आली. ही घटना वैद्यकीय क्षेत्रात एक आश्चर्यकारक घटना मानली जात आहे. “फीटस इन फीटू” मध्ये एका जुळ्या भावाच्या किंवा बहिणीच्या शरीरात दुसऱ्या जुळ्या भावाचा किंवा बहिणीचा अपूर्ण विकास होतो. ही स्थिती गर्भावस्थेतच निर्माण होते आणि दुसरा गर्भ पहिल्या गर्भाच्या शरीरात वाढतो. या दुर्मिळ घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात कुतूहल निर्माण झाले आहे. डॉक्टर अग्रवाल यांनी तातडीनं ही बाब वरिष्ठ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आणि या महिलेच्या प्रसूतीसाठी तिला तातडीनं संभाजीनगर इथं पाठवण्यात आलं.

