पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- ‘तेरवं’ हा चित्रपट ‘आर्यन्स सन्मान – २०२४’ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट समिक्षक पुरस्काराने सन्मानित झाला आहे. या चित्रपटाने आपल्या प्रभावी कथानक आणि सामाजिक संदेशामुळे खास स्थान मिळवले आहे.’तेरवं’ हा चित्रपट नरेंद्र जिचकर यांनी अंजनिकृपा प्रोडक्शन्स प्रा. लि. अंतर्गत निर्मित केला असून, याचे दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केले आहे. चित्रपटाचे लेखन आणि संवाद श्याम पेठकर यांचे असून, छायाचित्रण सुरेश देश्माने यांनी केले आहे. तसेच संगीताची रचना विरेंद्र लटणकर यांनी केली आहे.
या चित्रपटाचा मुख्य विषय शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या विधवांच्या जीवनातील दुःख आणि संघर्षावर आधारित आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन शेतीमध्ये अपयशी ठरल्यामुळे आत्महत्या करतात आणि त्यांचे कुटुंब, विशेषतः पत्नी, जीवनाच्या एका भयंकर वळणावर येतात. या गंभीर आणि संवेदनशील विषयावर ‘तेरवं’ चित्रपटाने प्रकाश टाकला आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे अभिनेत्री किरण खोजे यांनी, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तेरवं’ या चित्रपटाने ‘आर्यन्स सन्मान – २०२४’ मध्ये आपला ठसा उमठवला असून, हे सन्मान त्याच्या उत्कृष्ट कथा, अभिनय, आणि दिग्दर्शनाला दिलेले मूल्यांकन आहे. चित्रपटाने केवळ सामाजिक संदेश दिला नाही तर त्याने भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

