अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा शेकापूर (बाई) येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून बाल आनंद मेळावा साजरा केला.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक, सामाजिक ज्ञान मिळावे व आर्थिक बाबीची जाण व्हावी, बिन भिंतीच्या शाळेतील ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने हा मेळावा भरविण्यात आला होता. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आनंद मेळाव्याचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र खेकारे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण-तणाव दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देता यावा तसेच कमवा शिका याची जाणीव होण्यासह विविध व्यवसायाची माहिती व्हावी हा मेळाव्याचा उद्देश मुख्याध्यापक मालती मेश्राम यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडला.
आनंद मेळाव्यात चिमुकल्या पासून तर अबाल वृद्धांनी हजेरी लावली. मुलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शाळेतील शिक्षिका दिपाली सावंत यांच्या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती तर्फे वही, पेन असे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन इयत्ता चौथीतील विद्यार्थीनी रागिणी कैकाडे हिने तर आभार तिसरीतील दिव्यांश तिजारे याने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मालती मेश्राम शिक्षक रामकृष्ण ढबाले, परमेश्वर नरवटे, दीपाली सावंत तसेच मदतनीस मीरा भोयर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.

